जिममध्ये व्यायाम करताना पैलवान विक्रम पारखी याचा मृत्यू
हिंजवडी : जिम मध्ये व्यायाम करत असताना पैलवान विक्रम पारखी याचा (वय ३०) ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना (४ नोव्हेंबर) घडली. त्यामुळे परिसरात नागरिकांनी हळहळ व्यक्त केली जात आहे.
जिममध्ये व्यायाम करत असताना पैलवान विक्रम पारखी याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेमुळे कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
पैलवान विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरी हा किताब पटकवला होता. तो मुळचा मुळशी तालुक्यातील माण गावचा राहणारा होता. २८ नोव्हेंबरला वारजे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेमध्ये त्याने कुमार कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावली होती. झारखंड राज्याच्या रांची येथील कुस्तीस्पर्धेत त्याला ब्राँझ पदक मिळाले होते. त्याचा गुरु-शिष्य संबंध हिंदकेसरी अमोल बुचडे यांच्याशी होता. अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवली आणि एक आदर्श व गुणी खेळाडू म्हणून त्याची ख्याती होती.
दुर्दैवाने विक्रमचे १२ डिसेंबरला लग्न होणार होते. परंतु त्याआधीच या दुर्दैवी घटनेची माहिती कुटुंबाला मिळाली. पारखी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.विक्रम पारखी यांच्या मागे वडील माजी सैनिक शिवाजीराव पारखी, एक मोठा भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे.