मोड आलेले हरभरे खाल्ले म्हणून पत्नीने पतीला लाटण्याने मारले; सोमवार पेठेतील घटना
पुणे: पती-पत्नीच्या भांडणांची काही कारणं किरकोळ असतात. तर कधी ती अत्यंत गंभीर आणि टोकाची असू शकतात. पुण्यात एक अशी घटना घडली आहे. ज्यामध्ये पती-पत्नीच्या भांडणाचं कारण ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पत्नीने पतीला केवळ मोड आलेले हरभरे खाल्याने म्हणून मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता सोमवारी पेठेत घडली. याबाबत अमोल गुलाबराव सोनवणे (वय ४४, रा. सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रविवारी रात्री, पत्नीने पतीसाठी हरभरे भिजवले होते. पतीने ते खाल्ले. त्यामुळे दोघांमध्ये भांडण उभं राहिलं. या भांडणाच्या दरम्यान, पत्नीने पतीला लाटण्याने मारहाण केली. त्याच्या डोक्यात लाटणे मारले. लाटण्याचा फटका वाचवण्यासाठी पतीने आपले दोन्ही हात वर केले. त्यावर पत्नीने पतीच्या डोक्यात मिक्सरचे भांडे घातले. या भांडणात पत्नीने त्याची पॅन्ट खाली ओढल्याने ते खाली बसले. स्वत:ला वाचविण्यासाठी त्यांनी दोन्ही हात वर केले. तेव्हा पत्नीने हाताच्या करंगळीला जोरात चावा घेतला. त्यात त्यांचे नख तुटले.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पतीने तात्काळ समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पत्नीविरुद्ध फिर्याद दिली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ४० वर्षांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सध्या हवालदार परिट तपास करत आहेत.