जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; भुजबळ यांचे सूचक वक्तव्य
महायुती सरकारचा विस्तार नुकताच पार पडला. मात्र या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान दिले नाही. त्यामुळे भुजबळांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. पक्षातील वरिष्ठांनी व महायुतीच्या नेत्यांनी मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत. भुजबळांनी त्यांची नाराजी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली आहे.
भुजबळ यांना पुढच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नाराज भुजबळांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही का? पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल? यावर भुजबळ म्हणाले, “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. छगन भुजबळ आता काही मोठा निर्णय घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
छगन भुजबळ यांनी म्हटलं की, अजित पवार जेव्हा शरद पवार यांना सोडून बाहेर पडले तेव्हा सर्व म्हणत आहेत तर मी तुमच्यासोबत राहीन असं म्हणाले. पण मी अजित पवार यांच्यासोबत राहूनही पुन्हा सर्वांचे वार मीच झेलले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. दरम्यान, त्यांनी एक सूचक विधान केल्यानं खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांनी त्यांच्या मंत्रिपदाचाही आधीच राजीनामा दिला होता. त्यावेळी राजीनामा दिल्यानंतरही आमदार माझ्याविरोधात बोलले असल्याचं भुजबळ म्हणाले.