‘वेंकीज’च्या संचालकांच्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन, आयोजकांवर गुन्हा दाखल
पुणे : वेंकीज कंपनीचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या आवाजात लाउडस्पीकर व एलईडी लाईट लावून सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी बावधन पोलीसांनी आयोजकांवर कारवाई केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी या संदर्भात माहिती दिली.
या प्रकरणी आयोजक आदिनाथ संभाजी मते (रा. वेंकटेश्वरा हाउस, पुणे) यांच्याविरोधात रतीय न्याय संहितेचे कलम २९२, २९३, ध्वनी प्रदूषण नियम ३(१), ४(१), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम-३३ आर १३१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबरच्या रात्री ११:३० वाजल्यापासून ९ डिसेंबरच्या पहाटे २:३० वाजेपर्यंत वेंकीज कंपनीचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन कोकाटे वस्ती, बावधन येथ मते यांनी केले होते. या कार्यक्रमात मोठ्या आवाजात लाउडस्पीकर व एलईडी लाईट्स चालवले गेले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास झाला. ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करत कार्यक्रम सुरू ठेवला गेल्यामुळे आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महाले हे करत आहेत.