पुढील ६ महिन्यांत पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार; नितीन गडकरींची माहिती

देशातील मोटार उत्पादक कंपन्यांकडून पुढील सहा महिन्यांत शंभर टक्के बायोइथेनॉलवर चालणारी मोटारी सादर केली जाणार आहे. त्यासोबतच बायोइथेनॉलवरील दुचाकीही लवकरच बाजारात दाखल होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली. त्यामुळे लवकरच शंभर टक्के बायोइथेनॉलवरील वाहने धावताना दिसणार आहे.

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले की, मी इथेनॉलवर चालणारी टोयोटाची इनोव्हा मोटार वापरतो. पुढील सहा महिन्यांत ह्युंदाई, महिंद्रा, टाटा, सुझुकी या कंपन्या शंभर टक्के बायोइथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या सादर करतील. तसेच, बजाज, टीव्हीएस, होंडा, हिरो या कंपन्या शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर लवकरच बाजारात आणणार आहेत.

पूर्णपणे बायोइथेनॉलवर चालणारी वाहने अस्तित्वात आली, तर अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. पुण्यात प्रत्येक तालुक्यात साखर कारखाना असावा, जेणेकरून तिथे इथेनॉलची निर्मिती होईल. या ठिकाणी पेट्रोलला इथेनॉलचा पर्याय उपलब्ध होईल, आणि यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. याशिवाय, डिझेलमध्ये १५ टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचा प्रस्ताव ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) ने दिला आहे. यामुळे इथेनॉलचा वापर वाढून पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होईल, आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. याशिवाय, खनिज तेलाची आयात कमी करून आपण आत्मनिर्भर बनू, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

rushi