मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणारे दोन सराईत जेरबंद; अलंकार पोलिसांची कारवाई

पुणे: मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून २ लाख ६८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुमित उर्फ डायमंड राजु आसवरे (वय १९, किष्कींदानगर, कोथरूड) आणि अभिषेक उर्फ कानोळ्या भारत खंदारे (वय २२, किष्कींदानगर, कोथरूड) अशी गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

२४ डिसेंबर रोजी डी.पी. रोड येथे मॉर्निंग वॉकला आलेल्या एका नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चेन दोन अज्ञात व्यक्तींनी हिसकावून नेली होती. त्यानंतर ते तिसऱ्या साथीदारासह मोटारसायकलवरून फरार झाले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घटनेची माहिती वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

पोलीस उपआयुक्त संभाजी कदम आणि सहायक आयुक्त अजय परमार यांनी तत्काळ तपासाचे आदेश दिले. तपास पथकाने घटनास्थळावरील तसेच आजूबाजूच्या परिसरातील २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग घेतला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी किष्कींदानगर येथे सापळा रचून आसवरे आणि खंदारे या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी या प्रकारच्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून दोन सोन्याच्या चेन, एक सोन्याचे पेंडंट, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि एक तलवार असा एकूण २ लाख ६८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, आरोपींवर अलंकार पोलीस ठाण्यात दोन आणि चतुःशृंगी पोलीस ठाण्यात एक असे तीन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या मार्दगर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश दिक्षीत, महेश निंबाळकर, पोलीस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, शशिकांत सपकाळ, शिवाजी शिंदे, अंकुश लोंढे, साईनाथ पाटील, नवनाथ आटोळे, नितीन राऊत, माधुरी कुंभार, शंभवी माने, यांनी केली.

Leave a Reply

rushi