रूपाली चाकणकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दोघांना अटक
मुंबई – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
आकाश दिगंबर डाळवे (वय 30, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि अविनाश बापू पुकळे (वय 30, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील “राजकारण महाराष्ट्राचे” या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. या प्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.
पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम 78, 79, 351(3), 351(4), 61(2) BNS तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67A अंतर्गत मुंबई सायबर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी आकाश दिगंबर डाळवे याला मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे तर अविनाश बापू पुकळे याला उरळी कांचन येथून अटक करण्यात आली. या दोघांना आज गिरगाव येथील 18 व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या पूर्वी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.