सांगवीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग…चिंचवडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली हातात तुतारी ! : माजी स्थायी समिती चेअरमन नवनाथ जगताप अन अरुण पवार राष्ट्रवादीत डेरे दाखल : राहुल कलाटे यांचं पारड जड ; विरोधकांची डोकेदुखी वाढली
वाकड, ता. १० : चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ नुकतीच वाल्हेकर वाडी येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी, रोहित पवार यांच्या उपस्थितीत महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप आणि मराठवाडा विकास महासंघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे, मतदार संघातील आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांचं पारड जड झाले असून, विरोधकांची मात्र, डोकेदुखी वाढल्याची जोरदार चर्चा मतदार संघात पाहायला मिळत आहे.
जगताप हे सांगवीचे भूमिपुत्र असून, त्यांची परिसरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात मजबूत पकड आहे. उत्तम संघटन कौशल्य, तळागाळातील कार्यकर्त्यां बरोबर असलेला थेट संवाद यामुळे जगताप यांना मानणारा मोठा वर्ग पिंपळे गुरव, नवी आणी जुन्या सांगवी परिसरात आहे. आता, नवनाथ जगताप यांची कलाटे यांना थेट खंबीर साथ लाभल्याने विरोधकांची धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, वाल्हेकर वाडी येथे झालेल्या जाहीर सभेत जगताप यांच्या बरोबर, मराठवाडा विकास संघांचे अध्यक्ष अरुण पवार, माजी स्वीकृत सदस्य शिवाजी पाडुळे, निखिल चव्हाण, पंकज कांबळे यांनीही रोहित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जाहिर प्रवेश केला. ऐन, विधानसभा निवडणूकीच्या धामधूमीत सांगवी परिसरातील दिग्गजांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश झाल्याने प्रस्थापितांच्या बालेकिल्याला मोठे भगदाड पडल्याची जोरदार चर्चा मतदार संघात रंगली आहे.
===============================
चौकट : शरद पवार यांची सभा ठरणार निर्णायक !
पिंपरी चिंचवड शहरातील तीनही मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तगडे उमेदवार उभे आहेत. त्यांना, आघाडीतील काँग्रेस, शिवासेना (उबाठा) यांच्या सह सर्व घटक पक्षांचा खंबीर पाठिंबा मिळत असल्याने, तीनही ठिकाणी उमेदवार प्रस्थापितांना धोबीपछाड देतील असा विश्वास मतदार संघातून व्यक्त केला जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या ‘वारं फिरलंय’ अशी जोरदार चर्चा असताना, पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची शहरातील जाहीर सभा तीनही मतदार संघातील उमेदवारांसाठी निर्णायक ठरेलं असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
===================