पुणे विद्यापीठ परिसरात वृक्षतोड; राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचा तीव्र विरोध

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागासमोर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे. विद्यापीठ परिसरात दुर्मिळ आणि शेकडो वर्षांची झाडे असतानाही प्रशासन आणि महापालिका एकत्रितपणे झाडांची कत्तल करत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.

विद्यापीठ प्रशासनाने पर्यावरणाच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू केली असून, नंतर नवीन झाडे लावण्याच्या आश्वासनावर भर देत आहे. मात्र, यामध्ये कोणतीही वास्तविकता नसल्याचे राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे मत आहे.

राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांनी वेळोवेळी विद्यापीठाच्या आवारातून जिवंत झाडांची लाकडे ट्रकमध्ये भरून नेत असल्याचे पाहिले आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. विद्यापीठ प्रशासनाने विनाकारण झाडांची कत्तल थांबवावी आणि तोडलेल्या झाडांच्या जागेवर पुनरलागवड करावी. तसेच पुन्हा असे प्रकार घडून आल्यास राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस उग्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

rushi