एटीएममध्ये ज्येष्ठांची फसवणूक करणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, १६६ एटीएम कार्डांसह, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : शहरातील वेगवेगळ्या भागात एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. हा चोरटा कर्नाटकातील म्हैसूरचा असून त्याच्याविरोधात १६ गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १६६ एटीएम कार्ड, मोटार, दुचाकी आणि रोकड मिळून १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राजू प्रल्हाद कुलकर्णी (वय ५४, रा. अलानहली, म्हैसूर, कर्नाटक)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तपासात कुलकर्णीने २१ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तो एटीएममधून पैसे काढणाऱ्या वृद्धांना मदतीचा बहाणा करून त्यांचे कार्ड घेऊन त्यावर असलेला पासवर्ड जाणून घेत असे. त्यानंतर, पैसे निघत नाहीत असे सांगून त्यांच्या बदल्यात बंद झालेले एटीएम कार्ड देत असे. खरी कार्डे घेऊन तो पसार होत असे आणि खात्यातून पैसे काढून घेत असे.

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांजवे चौकातील एका बँकेच्या एटीएममध्ये २ फेब्रुवारी रोजी एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपआयुक्त संदिपसिंह गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक अरुण घोडके तसेच पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार अशोक माने, मयुर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, संतोष शेरखाने, नितीन बाबर व सागर मोरे यांनी केली.

चोरीच्या पैशातून मैत्रिणीसोबत मौजमजा
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या संख्येने सेवानिवृत्त नागरिक राहतात. याचा गैरफायदा घेत कुलकर्णी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेगवेगळ्या एटीएम केंद्रांवर पाळत ठेवत असे. एटीएममध्ये एकटे असलेल्या वृद्धांना मदतीच्या बहाण्याने तो गंडवत असे. त्याने विश्रामबाग, बिबवेवाडी, सिंहगड रोड, कोथरूड, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, सहकारनगर आणि आळंदी परिसरात फसवणुकीचे १६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा कुलकर्णीने आपल्या मैत्रिणीसोबत मौजमजेसाठी वापर केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

rushi