सतीश वाघ यांच्या हत्येमागील गूढ उलगडलं: शेजाऱ्यानेच पाच लाखांची सुपारी देऊन घडवली हत्या

हडपसर परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैयक्तिक वादातून शेजाऱ्याने पाच लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे.

सोमवारी (९ डिसेंबर) सकाळी फुरसुंगी फाटा येथून सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, आरोपींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले आणि सोलापूरच्या दिशेने नेले. त्याच दिवशी संध्याकाळी शिंदवणे घाट येथे वाघ यांचा मृतदेह सापडला.

मृतदेहाची स्थिती पाहता तीक्ष्ण हत्याराने वार आणि लाकडी दांडक्याचा वापर करून डोक्यावर आघात करण्यात आल्याचे दिसून आले. मारहाणीनंतर गुन्हेगारांनी मृतदेह घाटात टाकून पलायन केले. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली माहिती
सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. सतीश वाघ यांचे अपहरण आणि हत्या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने वैयक्तिक वादातून पाच लाख रुपयांची सुपारी देऊन केली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सुपारी देणाऱ्याला देखील अटक केली असून, या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेनंतर पोलीस आणि क्राईम ब्रँचच्या पथकांनी या प्रकरणाचा कसून तपास केला आहे. पोलिसांनी ४५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपींनी वापरलेली कार शोधून काढली. या कारच्या आधारेच पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा लागला आणि त्यांना अटक करण्यात यश आले. सतीश वाघ यांचा काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेजाऱ्यासोबत वैयक्तिक वाद झाला होता. याच वादातून शेजाऱ्याने पाच लाख रुपयांची सुपारी देऊन वाघ यांची हत्या घडवून आणली. पोलीस आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करत आहेत आणि चौकशीवर भर दिला आहे. प्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होईल याची खात्री पोलीस यंत्रणा करत आहे. पुढील तपासात अधिक माहिती उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Leave a Reply

rushi