चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय सचिव संजय जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज होणार संपन्न
‘कालियामर्दन’ मुकपटाच्या माध्यमातून १०५ वर्षांपूर्वीच्या सिनेयुगाचा अनुभव घेण्याची संधी
छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे असणार असून यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द व ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या व चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल व फ्रिप्रेसी ज्यूरी चेअरपर्सन लतिका पाडगांवकर, अभिनेत्री सीमा बिस्वास, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ९ वा. पीव्हीआर-आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली फ्रेंच आणि तामिळ भाषेतील फिल्म लिटील जाफना फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे.
या उद्घाटन महोत्सवाच्या दशकपुर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजन समितीच्या वतीने रसिकांना एका विशेष कार्यक्रमाची भेट दिली जाणार आहे. भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी १०५ वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिध्द मुकपट कालियामर्दन याचे विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याआधी संपन्न होणार आहे. शंभर वर्षांपूर्वीचे मुकपट सिनेगृहात प्रत्यक्ष संगीताद्वारे (लाईव्ह ऑर्केस्ट्रा) दाखविले जात. तोच अनुभव रसिकांना मिळावा म्हणून कालियामर्दन हा मुकपट कोलकाता येथील सतब्दीर सब्द या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखविला जाणार आहे. एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मीणी सभागृहात बुधवारी, दि. १५ जानेवारी २०२५ रोजी सायं. ५ वा. या मुकपटाचे प्रदर्शन करण्यात येईल. कालियामर्दन विशेष प्रदर्शन व उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांसाठी प्रवेश खुला आहे.