विद्यापीठातील ‘आदर्श’ कॅन्टीनमधील पिण्याच्या पाण्याच्या कुलरमध्ये पाय टाकून काढले पाणी?

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आदर्श कॅन्टीनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या कुलरमध्ये कर्मचारी पाय टाकून पाणी बाहेर काढत असल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा दावा विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राहुल सासणे यांनी केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून या कुलरमधील पाणी फरशी पुसण्यासाठी वापरले जात असल्याचे व्हिडिओद्वारे समोर आले आहे. विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापक याच कुलरमधून पाणी पित असल्याने हा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे.

राज्यात सध्या जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून, आरोग्य विभागाने नागरिकांना पाणी उकळून पिण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यापीठ कॅन्टीन आणि मेसमधील अस्वच्छतेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यापूर्वीही जेवणात आळी, झुरळे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या नव्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या संदर्भात ससाणे यांनी म्हटले की, विद्यापीठ प्रशासनाने पिण्याच्या पाण्याच्या कुलरच्या स्वच्छतेसाठी एका विशिष्ट कंपनीला जबाबदारी दिली आहे. या कंपनीचे कर्मचारी येऊन वेळोवेळी हे कुलर स्वच्छ करत असतात.

ससाणे यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, संबंधित कॅन्टीन चालकावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार अतिशय गंभीर आहे. याप्रकरणी कॅन्टीन चालकावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

विद्यापीठ प्रशासनाकडून यावर काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

rushi