कोथरूड परिसरातील हरवलेल्या तरुणाचा मृतदेह ताम्हिणी घाटातील खोल दरीत आढळला
पुणे: कोथरूड येथील हरवलेल्या १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह ताम्हिणी घाटातील देवकुंड व्ह्यू पॉईंटजवळील दरीत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शनिवारी, ३० नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास रेस्क्यू टीम व पोलिसांनी तरुणाचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढला. विराज ईश्वर फड (वय १८, रा. कोथरूड, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे.
२५ नोव्हेंबर रोजी विराज फड हा तरुण हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.