शिवसेनेकडून गृहखात्याची मागणी, शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष
मुंबई: महाराष्ट्रात सत्ता स्थापनेआधी जोरदार राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही महायुती अंतर्गत राजकारणामुळे सत्तास्थापनेसाठी विलंब होत आहे.
एकीकडे, दिल्लीतील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदांच्या वाटपावर चर्चा सुरू आहे. त्याबाबत त्यांच्यात एकमत नसल्यानेच सत्तास्थापनेसाठी उशीर होत असल्याचा कयास आहे.
गृहखात्याच्या वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचे समजते. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मागील सरकारप्रमाणेच शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रीपदाबरोबर गृहखाते असावे अशी भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या चर्चा माध्यमांमध्ये न करता पक्षांतर्गत सोडवायला हव्यात असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. तसेच ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर शपथविधी होणार असल्याचे देखील बावनकुळे यांनी आपल्या समाजमाध्यमावर घोषित केले. शिवसेना आणि राष्ट्रवादीने गटनेत्यांची निवड केली आहे. ३ डिसेंबरला भाजपही आपला गटनेता निवडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्या दरे या गावी आहे. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. डॉक्टरांनी त्यांना दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. माजी मंत्री दीपक केसरकर हे शिंदे यांची भेट घेण्यासाठी दरे गावी गेल्यानंतर शिंदे यांच्या तब्येतीमुळे भेट न घेता ते मुंबईला परतल्याचे समजले आहे.