पुण्यात शिवजयंती उत्साहात साजरी; १०० हून अधिक स्वराज्य रथांची मिरवणूक
पुणे: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त पुण्यात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘शिवजयंती महोत्सव समिती’च्या वतीने लालमहाल येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘जय शिवाजी जय भवानी’ च्या जयघोषात सोहळ्याला प्रारंभ झाला. यंदा या मिरवणुकीचे १३ वे वर्ष असून, सोहळ्यात शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यामुळे संपूर्ण पुणे शहर शिवमय झाले होते.
मिरवणुकीला लालमहालातील जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि ‘जिजाऊ माँसाहेब-शहाजी महाराज शिवज्योत’ प्रज्वलित करून सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि सनई-चौघड्यांच्या मंगलमय स्वरात हजारो शिवभक्त पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. आकर्षक फुलांनी सजवलेल्या शिवज्योतसह १०० हून अधिक स्वराज्य रथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच ५१ रणरागिणींच्या ‘महाराणी ताराराणी शौर्य पथका’ने मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. शिवकालीन युद्धकला आणि रणशिंगांच्या निनादाने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिवरायांचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, आमदार हेमंत रासने उपस्थित होते. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवरायांच्या ऐक्याच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.