ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन; तीन दिवस उपोषण

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारपासून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. लोकशाहीची सध्या थट्टा होत असून राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांनुसार आपण तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, वयाच्या 95 व्या वर्षी, त्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकशाही आणि ईव्हीएमवर सवाल
डॉ. आढाव म्हणाले की, देशात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू आहे . मतदानानंतर आकडेवारीत सातत्याने बदल होत असल्यामुळे ईव्हीएम प्रक्रियेवर संशय निर्माण होत आहे. लोकसभा निवडणुकीत वेगळा निर्णय आणि लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल कसे लागतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सरकारी योजनांवर टीका
निवडणुकीच्या काळात पैसे वाटप करणाऱ्या सरकारी योजनांना निवडणूक आयोगाने विरोध केला नाही, हे अत्यंत अनाकलनीय असल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे निवडणुकीत भ्रष्टाचाराला अधिकृतता मिळत असल्याची टीकाही त्यांनी केली.

सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप
देशात हिंदू-मुस्लिम वाद उफाळून आणले जात असल्याचा आरोप करत, जागरूक समाजाने याविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचे आढाव म्हणाले. अदानींचे प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशातून अदानींना समर्थन दिल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभेत अदानी प्रकरणावर चर्चा होऊ न देणे ही लोकशाहीविरोधी कृती असल्याची टीका करत, या सर्व प्रकारांविरोधात सत्याग्रह करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

rushi