संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मिक कराडला बीड न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला बीड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी वाल्मीक कराड वर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, त्याची पोलीस कोठडी आज संपणार होती. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज बीड न्यायालयात त्याला हजर करण्यात आले होते.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करूनही न्यायालयाच्या परिसरात चांगला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागच्या वेळी कराडला न्यायालयात हजर करताना मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे यावेळी सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.
वाल्मीक कराड याच्यावर मोक्कांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी पार पडली. यानंतर सीआयडीने संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याचे न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंत वाल्मिक कराड जामिनासाठी अर्ज करु शकतो, पण मोक्काची अट असल्याने त्याला तात्पुरता जामीन मिळवणे अवघड असल्याचे सांगितले जात आहे.
वाल्मिक कराडने ३१ डिसेंबर रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.