सिंहगड रोड परिसरात नायलॉन मांजाची विक्री, तरुणावर गुन्हा दाखल

पुणे: सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गस्तीदरम्यान पोलिसांच्या तपास पथकाने प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करत त्याच्याकडून ६ हजार ५०० रुपये किंमतीचे ११ रिळ नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी योगेश शत्रुध्न शहा (वय २०, रा. नेवसे हॉस्पिटल जवळ, वडगाव बु, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जानेवारी रोजी गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना मानाजीनगर, नऱ्हे परिसरात पोलीस अंमलदार अमोल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, वडगाव बुद्रुक येथील सिद्धी क्लासिक बिल्डिंग जवळ एक व्यक्ती नायलॉन मांजा विक्री करत आहे. त्यांनी ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना दिली. त्यानंतर आदेशानुसार पथकाने घटनास्थळी छापा टाकला.

या छाप्यात योगेश शहा हा व्यक्ती आढळला. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे खाकी बॉक्समध्ये ६ हजार ५०० रुपये किंमतीचे ११ नायलॉन मांज्याचे रिळ सापडले.

जप्त केलेल्या नायलॉन मांजाच्या साठ्याबद्दल आरोपीवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, १२५ आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम ५, १५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस अंमलदार संजय शिंदे करत आहेत.

Leave a Reply

rushi