महापालिकेच्या ‘मिशन १५’ अंतर्गत रस्ते होणार सुपरफास्ट; प्रमुख रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात; नेमके कोणते रस्ते? जाणून घ्या
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या ‘मिशन १५’ अंतर्गत महत्त्वाच्या रस्त्यांचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. या उपक्रमामुळे वाहतुकीचा वेग वाढणार असून, भविष्यात या रस्त्यांवर खोदाईला परवानगी दिली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. लोकप्रतिनिधींनीही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महापालिकेने १५ अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांची निवड करून त्यांच्या डागडुजी व डांबरीकरणाचे काम हाती घेतले. या कामांचा अंतिम टप्पा सुरू असून लवकरच सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाने दिली आहे.
एक महिन्याच्या कालावधीत या १५ रस्त्यांवर ६० हजार ७७२ चौरस मीटर क्षेत्राचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी ११ हजार १४३ मेट्रिक टन डांबराचा वापर करण्यात आला आहे. तसेच काही महत्त्वाच्या चौकांमध्ये थर्मोप्लास्टिक पेंटचा वापर करून रस्ते अधिक सुरक्षित आणि स्पष्ट करण्यात आले आहेत.
या मार्गावरील कामे झाली पूर्ण:
नगर रस्ता – पर्णकुटी चौक ते वाघोली बकोरी फाटा
सोलापूर रस्ता – वानवडी चौक ते आकाशवाणी मांजरी चौक
मगरपट्टा रस्ता – मगरपट्टा चौक ते खराडी बायपास चौक
पाषाण रस्ता – पुणे विद्यापीठ चौक ते पाषाण बावधन सर्कल चौक
बाणेर रस्ता- पुणे विद्यापीठ चौक ते सदानंद हॉटेल चौक
संगमवाडी रस्ता – सीओईपी चौक ते पर्णकुटी चौक
विमानतळ व्हीआयपी रस्ता – पुणे विमानतळ ते गुंजन चौक
कर्वे रस्ता – खंडोजी बाबा चौक ते वारजे चौक
पौड रस्ता – पौड फाटा चौक ते चांदणी चौक
सातारा रस्ता – स्वारगेट चौक ते गुजरवाडी चौक
सिंहगड रस्ता – लक्ष्मी मंदिर चौक ते नांदेड सिटी चौक
बिबवेवाडी रस्ता – पुष्पमंगल चौक ते अप्पर बस डेपो चौक
नॉर्थ मेन रस्ता – कोरेगाव पार्क पेट्रोल पंप ते ताडीगुप्ता चौक
गणेशखिंड रस्ता – सीओईपी चौक – पुणे विद्यापीठ चौक
छत्रपती शिवाजी -बाजीराव रस्ता -स्वारगेट चौक ते शिमला ऑफिस चौक शनिवारवाडा