धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार, महिलेसह तिघे अटकेत
पुणे: धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका 32 वर्षीय पीडित महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संतोष रामदास गायकवाड (वय, ५५, रा. धानोरी) , सागर मधुकर लांडगे (वय ३०, रा. धानोरी) आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला पहिल्यापासून एकमेकांना ओळखतात. आरोपींनी पीडित महिलेवर धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केली. आरोपी संतोष गायकवाड आणि सागर लांडगे यांनी आरोपी महिलेच्या धानोरी येथील घरात पीडित महिलेला डांबून ठेवले. दोघांनी पीडित महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवला. तसेच तिच्यावर बलात्कार केला. त्यासोबतच या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण देखील करण्यात आले. हे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी पीडित महिलेला देण्यात आली.
त्यानंतर आरोपी लांडगे यांनी पीडित महिलेला लोहगाव परिसरात नेऊन एका खोलीत डांबून ठेवले. तिला धमकावून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले, अशी माहिती तिने फिर्यादीत दिली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर बलात्कार तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे पुढील तपास करत आहेत.