पुणे हादरले! मावळमध्ये हॉटेल मालकाने केला ग्राहकाचा खून
पुण्यातील मावळ तालुक्यातील इंदोरी येथे जय मल्हार हॉटेलमध्ये ग्राहकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रसाद उर्फ किरण अशोक पवार असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी हॉटेल मालक अक्षय येवलेला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वादाची सुरुवात वेटरसोबत झालेल्या वादातून झाली. मृत प्रसाद पवार आणि त्याचा मित्र अभिषेक येवले यांनी वेटरशी वाद घालून त्याला मारहाण केली. या घटनेनंतर वेटरने हॉटेल मालक अक्षय येवलेला फोन करून माहिती दिली. मालकाने दोघांना शांत राहण्याचं सांगून स्वतः तिथे जाण्याची तयारी दर्शवली. मात्र, या संवादादरम्यान प्रसाद आणि अभिषेकने हॉटेल मालकाला शिवीगाळ केली.
काही वेळाने प्रसाद आणि अभिषेक कोयता घेऊन हॉटेलसमोर परत आले आणि हॉटेल बंद करत असलेल्या हॉटेल मालकाशी पुन्हा वाद घातला. यावेळी, अक्षय येवलेने त्यांच्या हातातील कोयता काढून त्यांच्या दिशेने वार केले. जखमी अवस्थेत दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु प्रसाद पवारचा मृत्यू झाला. अभिषेकवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी अक्षय येवलेला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू आहे.