पुणे : बिस्लेरी कंपनीला सिनियर अकाऊंटंट आणि सेल्स एक्सिक्युटिव्ह यांनी मिळून लावला 50 लाखाचा चुना
ग्राहकांकडून रोख रक्कमा स्वीकारुन ती रक्कम बँक खात्यात जमा केल्याची बनावट नोंद करुन कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख बनवून बिस्लेरी कंपनीच्या सिनियर अकाऊंटंट आणि सेल्स एक्सीक्युटिव्ह यांनी मिळून कंपनीला ५० लाख ३० हजार ९७० रुपयांना गंडा घातला. कंपनीने सिस्टिममध्ये चुकीची इंट्री झाल्यास ती दुरुस्त करण्याचे अधिकार सिनिअर अकाऊंटला दिले होते. त्याचा गैरफायदा घेऊन ही फसवणुक झाली आहे. एका महिला अकाऊंटला यातील एका इंट्रीबाबत शंका आल्याने वरिष्ठ पातळीवरुन चौकशीत ही फसवणुक उघड झाली.
याबाबत बिस्लेरी इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीचे विभागीय शाखेचे वरिष्ठ विक्री व्यवस्थापक रवी श्रीकांत जहागीरदार (वय ३९, रा. नर्हेगाव) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कंपनीतील तत्कालीन सिनिअर अकाऊंटंट अजय अशोक मोरे(रा. आनंदनगर, सिंहगड रोड) आणि सेल्स एक्सिक्युटिव्ह सचिन नामदेव धोत्रे(रा. दिघी, पिंपरी चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बिस्लेरी इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीच्या वडगाव बुद्रुक येथील विभागीय कार्यालयात १४ मे ते २६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिस्लेरी कंपनीच्या वडगाव बुद्रुक येथील विभागीय कार्यालयात ३० जण काम करतात. अजय मोरे याची सिनिअर अकाऊंटंट पदावर डिसेबर २०१२ पासून नियुक्ती करण्यात आलेली होती. तसेच सचिन धोत्रे याची १४ सप्टेबर २०१८ रोजी सेल्स एक्सिक्युटिव्ह म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. अजय मोरे याच्याकडे सिनिअर अकाऊंटंट म्हणून कंपनीच्या बँक खात्यामध्ये ग्राहकांकडून येणार्या रक्कमेची खात्री करुन संबंधित ग्राहकाच्या नावाने कंपनीने त्यांना पुरवलेल्या मायक्रोसॉफ्ट डायनामिक ३६५ या सॉफ्टवेअरच्या आधारे स्वत:च्या लॉगइन आय डीवरुन ग्राहकांच्या पोर्टफोलिओमध्ये नोंदणी करण्याचे काम होते.यामध्ये ग्राहकांकडून आलेल्या पैशांची सिस्टिमध्ये चुकीची इंट्री दुरुस्त करण्यासाठी इंस्ट्री रिव्हर्स केली जाते. त्याचे अधिकारी सिनिअर अकाऊंटंट म्हणून अजय मोरे याला अधिकार होते. सचिन धोत्रे याने प्रत्यक्षात ग्राहकांना भेटणे, त्यांची ऑर्डर प्राप्त करणे व त्यांचेकडून प्राप्त ऑर्डरप्रमाणे सेल्स कोऑर्डिनेटर यांच्या मार्फतीने सिस्टिमध्ये ऑर्डर प्रोसेस करणे व ग्राहकांशी बोलून प्राप्त ऑर्डरची रक्कम कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगणे. तसेच वितरकामार्फतीने पॅकेज ड्रिंकिग वॉटर या मालाची पुर्तता करणे अशा प्रकारे कामाचे स्वरुप होते.
कंपनीच्या अकाऊंटं प्रमुख रेश्मा रायकर यांच्या लक्षात आले की, २३ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीच्या सिस्टिममध्ये ५४ लाख ७१ हजार ८४० रुपयांच्या रिव्हर्स इंट्री झाल्याचे दिसले. त्यांनी ही बाब इंदौर येथील सिनिअर अकाऊंटंट मॅनेजर विनय अग्रवाल यांना कळविली. त्यानंतर या दोघांनी संयुक्त चौकशी केली. त्याच प्रकारे २६ नोव्हेबर २०२४ रोजी अजय मोरे हा रजेवर असताना त्याच दिवशी सकाळी ७ लाख ९२ हजार ४७० रुपयांच्या खोट्या इंट्रीज केल्याचे आढळले.