पुणे: शाळेत कपडे बदलताना विद्यार्थिनींचे रेकॉर्डिंग, शिपायावर गुन्हा दाखल
पुणे : ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाषाण भागातील एका नामांकित शाळेतील चेंजिंग रुममध्ये शाळेतील शिपायाने विद्यार्थिनींचे मोबाईल कॅमेरा वापरून चित्रीकरण केले. या प्रकारामुळे शाळेत खळबळ उडाली आहे. आरोपी शिपायावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे.
6 जानेवारीला शाळेतील खेळाच्या तासानंतर विद्यार्थिनी ड्रेस चेंज करण्यासाठी किचन रुममध्ये गेल्या. त्या वेळी शिपाई सरोदे तिथे होता. विद्यार्थिनींनी त्याला रुममधून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, शिपाईने मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवून त्याला स्विच बोर्डावर ठेवले आणि विद्यार्थिनींचे चित्रीकरण केले.
हा प्रकार विद्यार्थिनींनी लगेचच लक्षात घेतला आणि त्या विद्यार्थिनींनी मोबाईलमधून व्हिडीओ डिलीट केला. त्यानंतर त्यांनी घडलेली संपूर्ण घटना आपल्या पालकांना सांगितली. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला भेट दिली आणि या प्रकरणाची चौकशी केली. शिपायाला विचारल्यावर त्याने सुरुवातीला नकार दिला. मात्र, शाळेच्या व्यवस्थापनाने कडक चौकशी केल्यावर शिपाईने त्याचा मोबाईल रेकॉर्डिंगसाठी वापरल्याची कबुली दिली.
यानंतर शाळेने पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी शिपायाला अटक केली. आरोपीविरोधात पोक्सो आणि बी.एन.एस कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.