पुण्यात हुक्क्याचे प्रोटेक्शन मनी घेणारा पोलीस कर्मचारी निलंबित
पुणे :पुण्यातून पोलिसच प्रोटेक्शन मनी घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉटेलमध्ये सुरू असलेला अवैध हुक्का सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली सहा हजार रुपये घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे.
हरिचंद्र राजाराम पवार असं निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पवार हे वानवडी पोलिस ठाण्यात बीट मार्शल कर्तव्यावर होते.
हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्क्यावर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार लुल्लानगर येथील विजेता रुफटॉप हॉटेलमध्ये वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक धनाजी टोणे आणि त्यांच्या पथकाने तीन हुक्का पॉट, डीव्हीआर, एक लॅपटॉप आणि चार मोबाईल जप्त केले. हॉटेलमालक राहुल सुरेखा जैनसिंघाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैनसिंघालच्या मोबाईलमध्ये पोलिस कर्मचारी हरिचंद्र यांचा मोबाईल क्रमांक वानवडी मार्शल नावाने आढळून आला.२६ डिसेंबर रोजी पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली तेव्हा हरिचंद्र यांनी जैनसिंघाल याला कॉल केल्याचे दिसून आले. तसेच, जैनसिंघाल याने चौकशीत सांगितले की, पोलिस कर्मचारी हरिचंद्र यांना प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये देतो. हा प्रकार समोर आल्यानंतर वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी पोलिस उपायुक्त कार्यालय परिमंडल-५ यांच्याकडे हरिचंद्र यांनी कर्तव्यात कसुरी केल्याबाबतचा अहवाल पाठविला होता. हरिचंद्र यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.