Pune Police: वेगवेगळ्या राज्यांत घरफोडी, ५० हून अधिक गुन्हे दाखल; अट्टल चोरटा १६ लाखांच्या मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

पुणे: महाराष्ट्र तसेच कर्नाटक आणि गुजरात राज्यात घरफोड्या करणारा, तब्बल ५० हून अधिक गुन्हे दाखल असलेला आणि ग्रामीण भागात घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे हा सराईत नुकताच न्यायालयाकडून जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडला आहे. त्यानंतर त्याने भोर परिसरात चार घरफोड्या केल्या.

लखन अशोक कुलकर्णी उर्फ सचिन राजू माने (वय ३१, रा. मंगळवेढा, जिल्हा सोलापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर शहरातील श्रीपतीनगर भागात एकाच वेळी चार बंद घरांचं कुलूप तोडून चोरीची घटना 13 जानेवारी रोजी घडली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या घटनेचा तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता माने याने घरांची आधीच पाहणी केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी माने याचा माग काढण्यास सुरुवात केली.

माने हा मोटारीने शिरवळकडून पुण्याकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांच्या तपास पथकाने मानेचा पाठलाग केला. ससेवाडी परिसरामध्ये सापळा रचून माने याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपी माने याच्या आधार कार्डवर लखन अशोक कुलकर्णी असे नाव आहे. मात्र तो सचिन माने नावाने वावरतो. दरम्यान पोलिसांनी माने याच्याकडून ऐवज तसेच मोटार असा १६ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, सहायक निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस कर्मचारी बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, मंगेश भगत, महेश बनकर, मंगेश थिगळे, विजय कांचन, धीरज जाधव, अजित भुजबळ, काशिनाथ राजापुरे, केतन खांडे, अतुल मोरे यांनी ही कामगिरी केली.

राज्य बाहेर घरफोड्या
आरोपी माने याने महाराष्ट्र तसेच गुजरात आणि कर्नाटक मध्ये घरफोड्यांचे गुन्हे केले आहेत. माने याच्यावर तब्बल ५० हून अधिक जास्त गुन्हे दाखल आहेत. कर्नाटक मध्ये चोरीच्या गुन्ह्यात त्याला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Leave a Reply

rushi