पुणे गारठले; हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद
पुणे शहरातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दिवाळीनंतर थंडीचा प्रभाव वाढला आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सतत घट होत आहे. त्यामुळे पुण्यातील काही ठिकाणी, जसे की राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि शिवाजीनगर येथे किमान तापमान एक अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले. पुण्यात ८ ते ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते, आणि दिवसा गारवा जाणवू लागला होता. परंतु त्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाने थंडीचा प्रभाव कमी केला, हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. त्यामुळे ऐन हिवाळ्यात उकाडाही सहन करावा लागला. आता पुन्हा गारवा जाणवू लागला आहे.
पुणे शहरात हवामान विभागाच्या तापमान नोंदी (सोमवारी)
एनडीए: ६.१ अंश सेल्सिअस (सर्वांत कमी)
शिवाजीनगर: ७.८ अंश सेल्सिअस
लोहगाव: १२ अंश सेल्सिअस
कोरेगाव पार्क: १३.१ अंश सेल्सिअस
चिंचवड: १४.५ अंश सेल्सिअस
राज्यात थंडीची लाट:
उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात थंडीची लाट पसरली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये गारठल्याचे चित्र दिसून येत आहे. रविवारी (ता. १५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात कमी तापमान ४.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पंजाबमधील ‘अदमपूर’ येथे देशातील सपाट भूभागावर सर्वात कमी १.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुणे शहरात आज (१६ डिसेंबर) हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे.