पुणे : स्वारगेटवरील ‘खळ्ळखट्याक’ वसंत मोरेंच्या भोवणार?; अजित पवारांनी दिले संकेत
पुणे : स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरूणीवर बलात्काराच्या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी स्थानकावर दाखल होत सुरक्षा केबिनची तोडफोड केली होती. त्यांच्या या तोडफोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना फोन करून त्यांचं आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, आता केलेलं हे खळ्ळखट्याक वसंत मोरेंसह पक्षाच्या अंगलट येण्याची शक्यता असून, पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी यावर कारवाई करण्याचे संकेत देत इशारा दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
स्वारगेट येथील घटनेनंतर वसंत मोरेंनी स्थानकात जाऊन तोडफोड केली. त्याबाबत अजितदादांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, पूर्ण तपास होऊन सत्यता पुढे येऊ द्या. एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करत असाल तर, स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कोणी करत असेल तर तो पक्ष किंवा त्या कार्यकर्त्याकडून वसूल केला पाहिजे असं कोर्टाने सांगितलं आहे.
राग व्यक्त करण्याच्या काही गोष्टी असू शकतात. पण, काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय त्यामुळे त्यांच्यावरही कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल असे अजितदादा म्हणाले. राग सगळ्यांना येतो. त्याबद्दल दुमत नाही. परंतु, सार्वजनिक मालमत्तेच नुकसान जर कोणी करत असेल तर, तो पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, तर त्या पक्षाकडून ती सर्व वसुली झाली पाहिजे. अजितदादांच्या या विधानानंतर आता वसंत मोरेंसह ठाकरे गटावर कोणत्याप्रकारची कारवाईकेली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.