Pune Crime : घरी कोणी नसताना ‘तिला’ घरी बोलावलं;पुण्यात महिलेवर वारंवार बलात्कार
पुण्यात महिला सुरक्षीतचेचा प्रश्न दिवसागणीक गंभीर बनत चालला आहे. असाच काहीसा प्रकार लोणी काळभोरमधून समोर आला आहे. घरी कोणी नसताना नोकरदार महिलेला घरी बोलावले. त्यानंतर महिलेचे फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे.याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एका चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश रमेश अनपट ( वय 27, उरुळी कांचन, ता.हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 23 वर्षीय पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता या एका खाजगी ठिकाणी नोकरी करतात. तर लोणी काळभोर परिसरात भाड्याच्या घरात राहतात. आरोपी महेश अनपट हा वाहन चालक असून तो थेऊर परिसरात राहतो. फिर्यादी व आरोपी हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत.दरम्यान, आरोपी महेश अनपट याने एके दिवशी फिर्यादी यांना घरी बोलावले. तेव्हा आरोपी हा घरी एकटाच होता. यावेळी आरोपीने फिर्यादी यांचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्यावर वारंवार बलात्कार केला. सदर प्रकार हा जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत घडला आहे.
वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी महेश अनपट याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64, 351(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.