Pune Crime: ‘डेटिंग ॲप’वरील ओळखीतून व्यावसायिकाला लुटणारा अटकेत

सध्याच्या डिजिटल युगात मोबाइल ॲपचा वापर वाढला असून, काही ॲपचा गैरवापर करून गुन्हेगारीकडे वळणारी प्रवृत्तीही समोर येत आहे. ‘ग्राइंडर’ ॲपच्या माध्यमातून समलैंगिक तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नांदेड सिटी पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी १८ वर्षीय भारत किसन धिंडले (रा. धायरी) या आरोपीला अटक केली असून, त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांनादेखील ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एका ३२ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने तक्रार दाखल केली होती.

तक्रारदाराने ‘ग्राइंडर’ ॲपद्वारे एका तरुणाशी संवाद साधला होता. त्यानुसार, १४ जानेवारी रोजी सायंकाळी डीएसके विश्व सोसायटीच्या कमानीजवळ भेटण्याचे ठरले. संबंधित तरुणाने तक्रारदाराला एका निर्जनस्थळी नेले, जिथे तीन साथीदारांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडून २४ हजार ५०० रुपयांचा ऐवज, मोबाईल आणि सोन्याच्या बाळ्या लुटण्यात आल्या.

तक्रारदाराने सुरुवातीला आपली बदनामी होईल या भीतीने पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, पोलिसांनी समाजमाध्यमांवरील माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.

धायरी परिसरातील डीएसके विश्व रस्त्यावर नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या भागात गस्त वाढवली होती. याच दरम्यान, गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला आणि अक्षय जाधव यांनी व्यावसायिकाला लुटणाऱ्या आरोपी भारत धिंडलेला संशयास्पद अवस्थेत थांबलेले पाहिले. सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत धिंडले आणि त्याच्या साथीदारांनी १४ जानेवारी रोजी व्यावसायिकाला लुटल्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदडे सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, राजू वेगरे, प्रशांत काकडे, मोहन मिसाळ यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

rushi