पुणे : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि लक्ष्मी रस्ता येथून मिरवणूक निघत असल्यामुळे पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केला आहे.
भवानी पेठेतील भवानीमाता मंदिर येथून शिवप्रतिमेची मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे. छत्रपती शिवाजी पुतळा (सिव्हिल कोर्ट) येथे मिरवणुकीची सांगता होणार असल्यामुळे शिवाजी रस्ता व लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या बसचा मार्ग बदलण्यात येणार आहे.
या मार्गावरील बसेस जंगली महाराज रस्ता, डेक्कन, टिळक चौकाच्या पुढे कुमठेकर रस्ता, विश्रामबाग वाडा , मंडईमार्गे स्वारगेट चौकात येऊन पुढे नेहमीच्या मार्गाने जातील.
लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद झाल्यावर या मार्गावरील बस पुणे स्टेशनमार्गे , पोलिस आयुक्त कार्यालय , वेस्टएंड टॉकीज , महात्मा गांधी बसस्थानक , गोळीबार मैदान, स्वारगेट व पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील. फडके हौद/दारूवाला पूल वाहतुकीस बंद झाल्यानंतर या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडे जाताना कुंभारवाडा, जुना बाजार, मंगळवार पेठ या मार्गाने संचलनात राहतील.