विश्रांतवाडी परिसरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, आरोपी जेरबंद
पुणे : गुन्हे शाखेच्या भरोसा सेलने धानोरी जकात नाका जवळील विश्रांतवाडी येथील “आर्मोनिया फॅमिली स्पा” (Armonia Family Spa) मध्ये छापा मारून वेश्याव्यवसाय चालवत असलेल्या आरोपीला अटक केली. तसेच दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.
या कारवाईत स्पा मॅनेजर आणि मालक सुरज भरत शाहू (रा. वाशी, ठाणे आणि सध्या रा. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३ आणि अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायदा, १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ डिसेंबर रोजी, गोपनीय माहितीच्या आधारे विश्रांतवाडी परिसरातील गुडविल स्क्वेअर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील शॉप नंबर २१४ येथे “आर्मोनिया फॅमिली स्पा” मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची बातमी मिळाली. त्यानंतर, बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत २० हजार रुपयांचे दोन मोबाईल, तसेच २ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण २२,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगीता जाधव व भरोसा सेलच्या पथकाने पार पाडली.