पीएमपीचा तिकीटदर वाढवण्याचा प्रस्ताव; सर्वसामान्यांचा प्रवास महागणार

पुणे: पीएमपीएमएलचा (पुणे महानगर परिवहन महामंडळ) तोटा ७५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कर्मचार्‍यांच्या कायमस्वरूपी सेवेमुळे वेतनाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आर्थिक अडचणींवर तोडगा काढण्यासाठी तिकीट दर वाढवण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे तिकीट दर वाढल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.

पीएमपीला पुणे शहरची जीवनवाहिनी मानली जाते. मागील अनेक वर्षांपासून शहर व परिसरातील प्रवाशांना पीएमपी सेवा पुरवत आहे. पीएमटी (Pune PMT) आणि पीसीएमटी (PCMC MT) या दोन वाहतूक व्यवस्थांच्या विलीनीकरणातून पीएमपीएमएलची स्थापना झाली. यानंतर सेवा केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडपुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावांपर्यंत पोहोचली. मात्र, वाढत्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी होत असल्याने पीएमपीएमएलचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. चालू आर्थिक वर्षात हा तोटा ७५० कोटी रुपयांवर गेला आहे.

तोट्यासोबतच खर्चही वाढत आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने आणि मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत घेतल्याने वेतनाचा भार वाढला आहे. याशिवाय इंधन खर्चातील वाढही हा तोटा अधिक गंभीर करत आहे. मागील आठ वर्षांपासून तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच उत्पन्न वाढवण्याचे पर्यायही मर्यादित आहेत. परिणामी, पीएमपीएमएलची आर्थिक तूट पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांना ६०:४० च्या प्रमाणात भरून काढावी लागत आहे.

महानगरपालिकांवरील हा आर्थिक भार सतत वाढत असून पीएमआरडीए हद्दीतही सेवा पुरवित असल्याने राज्य शासनाने पीएमआरडीएला तूट भरून देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पीएमआरडीएकडून केवळ एकदाच १८७ कोटी रुपये पीएमपीएमएलला देण्यात आले आहेत. त्यानंतर निधी न मिळाल्याने पीएमपीएमएलची स्थिती अधिकच बिकट होत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने तिकीट दर वाढवण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

Leave a Reply

rushi