रामदरा परिसरात गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

पुणे : लोणी काळभोर भागातील रामदरा परिसरात गावठी दारू तयारी करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखच्या पोलीस पथकाने छापा टाकला. या कारवाईतएक लाख ५० हजारांची १५०० लीटर तयार दारू, १० लाखांचे २० हजार लीटर रसायन तसेच दारू तयार करण्याचे साहित्य, मोटार, ड्रम, एअर ब्लोअर, सरपण तसेच इतर असा अकरा लाख ६० हजारांचा मुद्देमाल सापडला.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, १८ फेब्रुवारीला पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आपल्या पथकासह कोंबिंग ऑपरेशन करीत असताना कांबळे यांना रामदरा रस्ता परिसरात असलेल्या ओढ्याच्या बाजूला मुकेश कर्णावत हा अवैध हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव यांनी आपल्या पथकासह या अवैध गावठी दारू भट्टीचा शोध घेतला. पोलिसांना कर्णावत हा गावठी दारूची भट्टी चालवत असल्याचे आढळून आले. मात्र पोलिसांना बघताच कर्णावत अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेला. पोलिसांनी कर्णावत याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गु्न्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक अनिल जाधव, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबे यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

rushi