मोक्क्यातील गुन्ह्यात जामीनावर असलेल्या गुन्हेगाराकडून पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त
पुणे: शहरात राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने मोक्का गुन्ह्यामधील जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त केले आहे.
अनिकेत गुलाब यादव (वय २२, रा. सोपानगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, १३ फेब्रुवारीला शहर पोलीस दलाकडून कोम्बिंग ऑपरेशन आयोजित केले होते. युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण आपल्या पथकासह लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार सकटे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सोपान नगर, कदमवाक वस्ती येथून गुन्हेगार अनिकेत गुलाब यादव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी पंचांसमक्ष ते जप्त केले.
आरोपी यादव विरुद्ध आर्म्स अॅक्टचे कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(अ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपासासाठी त्याला लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले.
ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.