पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला मारहाण
पिंपरी-चिंचवड:मध्यस्थी करणाऱ्या महिलेस आणि प्रेयसीला प्रियकराच्या कुटुंबीयाकडून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडला. या घटनेनंतर प्रेयसी गावी निघून गेली.
याप्रकरणी पत्नी, आकाश तावडे यांच्यासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी आणि शेजारणीला मारहाण करणाऱ्या महिलेच्या पतीचे प्रेमप्रकरण सुरू होते. मुलगी देखील शेजारीच राहत होती. तक्रारदार महिला दोघांमध्ये मध्यस्थी करत असल्याचा संशय होता. शुक्रवारी संबंधित मुलीला पाहून आरोपी महिलेच्या कुटुंबाचा राग अनावर झाला. ही मुलगी कशाला तुझ्याकडे आली आहे. तिच्यामुळे माझ्या मुलीचा संसार तुटत आहे. फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी आणि कंबरेच्या बेल्टने मारहाण केली. प्रेयसीला देखील मारहाण करण्यात आली असे तक्रारीत म्हटलं आहे. परत ती मुलगी इथं दिसली तर जिवंत सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण झाल्यानंतर प्रेयसी गावी निघून गेली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.