पुणे स्टेशन परिसरात चोरट्यांची दहशत, पैसे देण्यास नकार दिल्याने केला ब्लेडने वार
पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर चक्क ब्लेडने वार केल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका २८ वर्षीय तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
वडिथा गोविंदा नाईक (वय २८, रा. बिबवेवाडी) यांनी या संदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी वडिथा नाईक हे पुणे स्टेशन स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ जवळून शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जात होते. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवले. त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. नाईक यांनी पैसे देण्यास नकार दिला. चोरट्याने नाईक यांच्या खिशातील आठशे रुपये काढून घेतले. तसे करताना नाईक यांनी चोरट्याला विरोध केला. मात्र चोरट्याने फिर्यादी नाईक यांच्यावर ब्लेडने वार केले. नाईक यांनी आरडाओरडा केला. ते बघून चोरटा तिथून पसार झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत.