‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करणारच; उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत कडाडले
मुंबई : कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसावर झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेत “महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा ‘मान-सन्मान’ राज्यात ठेवला जाईल”, अशा कठोर आणि रोखठोक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत राज्य सरकारची भूमिका मांडली. राज्यातल्या जनतेला आश्वस्त करत, या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, असे आदेश देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात म्हणाले.
कल्याण येथील योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला मारहाण आणि अन्याची बाब ‘पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन’च्या माध्यमातून आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या सभागृहाचे सदस्य सुनील प्रभूं यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा महाराष्ट्र ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा महाराष्ट्र आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात देण्यात आलेली माहिती तातडीने तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान-सन्मान राज्यात ठेवला जाईल, अशाच पद्धतीने प्रशासन वागेल, याची खात्री मी सभागृहाला देतो. त्यावर याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले.