राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधी पक्षांनी आरोप केला आहे की, धनखड हे पक्षपातीपणे सभागृहाचे कामकाज चालवत आहेत आणि विरोधी पक्षातील सदस्यांना मते मांडण्यासाठी संधी दिली जात नाही. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबत ‘एक्स’च्या माध्यमातून माहिती दिली आहे.
मंगळवारी इंडिया आघाडीतील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांच्या एकूण ७० खासदारांनी या प्रस्तावावर सह्या केल्या आहेत.
तथापि, राज्यसभेतील एकूण संख्याबळ पाहता हा प्रस्ताव नामंजूर होण्याची शक्यता आहे. परंतु विरोधकांचा हेतू धनखड यांची कार्यशैली उघड करण्याचा आहे. भारताच्या संसदीय इतिहासात असे पहिल्यांदाच घडणार आहे.
सभागृहातील गदारोळ
याचवेळी, भाजपाने काँग्रेसवर टीका करत आरोप केला की, सोनिया गांधी सहअध्यक्षा असलेल्या ‘फोरम ऑफ डेमॉक्रसी लिडर्स इन आशिया पॅसिफिक’ या संस्थेला अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी आर्थिक मदत केली आहे. काँग्रेसने या आरोपांना फेटाळत भाजपावर गौतम अदानी प्रकरणाच्या फजितीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. दोन्ही सभागृहांमध्ये या मुद्द्यावर जोरदार गोंधळ उडाला. अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.