हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, नवी पेठ परिसरातील घटना
पुणे: हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची घटना नवी पेठेतील राजेंद्रनगर एसआरए वसाहतीत घडली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
खून झालेल्या तरुणाचे नाव आनंद परमेश्वर डोलारे (वय ३०, रा. राजेंद्रनगर एसआरए वसाहत) असे आहे. तर मन्या सोनावणे (रा. राजेंद्रनगर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आनंद डोलारे यांच्या आई वनिता डोलारे (वय ५७) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद डोलारे याला दारूचे व्यसन होते. ५ जानेवारी रोजी रात्री कामावरून परतल्यानंतर तो वसाहतीत थांबला होता. आरोपी मन्या सोनावणे याने आनंदला हातउसने पैसे दिले होते, परंतु पैसे परत न केल्याने आरोपी नाराज होता. रात्री साडेआठच्या सुमारास वसाहतीत त्यांच्यात पैशांवरून वाद झाला. वादाच्या रागातून आरोपीने आनंदला दांडक्याने मारहाण केली आणि त्याला जमिनीवर आपटले. या घटनेत आनंदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
गंभीर जखमी अवस्थेत आनंदला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी मन्या सोनावणे याला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप खाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.