मुरलीधर मोहोळ यांनी घेतली देवेंद्र जोग यांची भेट; म्हणाले, आज देवेंद्र उद्या कोणत्याही तरुणाच्या बाबतीत…
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजप कार्यकर्ते देवेंद्र जोग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बुधवारी जोग यांना तीन गुंडांनी मारहाण केली होती. मारहाणीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे म्हणत मोहोळ यांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेनंतर पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, मोहोळ यांनी जोग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. देवेंद्रला जबर दुखापत झाली असून आरोपींना अटक झाली असून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
बुधवारी (ता. १९) सायंकाळी कोथरूडमध्ये भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोग यांच्यावर तीन सराईत गुन्हेगारांनी हल्ला केला. गर्दीतून दुचाकी काढण्याच्या वादातून या हल्ल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१) आणि अमोल विनायक तापकीर (३५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी भेलकेनगर परिसरात शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्याच वेळी, जोग हे खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. मिरवणुकीतील गर्दीतून दुचाकी काढताना वाद झाला आणि त्यानंतर तीन गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी त्वरित कारवाई करत तिघा संशयितांना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
देवेंद्र जोग यांच्या भेटीविषयी मुरलीधर मोहोळ यांची ‘एक्स’वर पोस्ट
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाणीच्या घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या निवासस्थानी सपत्नीक जाऊन भेट घेतली. तीन दिवस गुजरात आणि दिल्लीमध्ये असल्याने पुण्यात पोहोचल्यावर थेट देवेंद्रच्या घरी पोहोचलो. देवेंद्रकडून सगळा घटनाक्रम समजून घेत त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत देवेंद्रला जबर दुखापत झाली असून आरोपींनाही अटक झाली आहे. तसेच आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या आहेत. देवेंद्र एक कर्तबगार संगणक अभियंता असून अतिशय मितभाषी आणि शांत स्वभावाचा तरुण आहे. कोणाच्याही हकनाक वाट्याला न जाणाऱ्या देवेंद्रसारख्या तरुणाला मारहाण होते, हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही. आज देवेंद्रच्या बाबतीत असा प्रकार घडला उद्या कोणत्याही तरुणाच्या बाबतीत होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती पावले उचलण्याबाबतही पोलीस आयुक्तांना सूचना केल्या आहेत.