कोंढवा: सिंहगड सिटी स्कुलमध्ये वीजेचा धक्का बसून कामगाराचा मृत्यु; संचालकांसह इतरांवर गुन्हा दाखल
पुणे : बस धुण्यासाठी उभारण्यात आलेल्या दोषपूर्ण कॉम्प्रेसरमुळे एका कामगाराचा वीजेचा धक्का बसून मृत्यू झाला. कॉम्प्रेसरला अर्थींग नसल्याने हा प्रकार घडला. कोंढवा भागातील सिंहगड सिटी स्कुलमध्ये १८ ऑक्टोबर २०२४ रोजी ही घटना घडली.
संतोष पांडुरंग माळवदकर (वय ४९) असे मृत्यु पावलेल्या कर्मचार्याचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सुनिता संतोष माळवदकर (वय ४१, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, सिंहगड सिटी स्कूलचे कॅम्पस संचालक धनंजय तुकाराम मंडलीक, संस्थेचे ट्रान्सपोर्ट सुपरवायझर दौलत दत्तात्रय ढोक, इलेक्ट्रीक सुपरवायझर विजय संपत कुंभार आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील टिळेकरनगर येथील सिंहगड सिटी स्कुलमध्ये १८ ऑक्टोबर २०२४ या दिवशी संतोष माळवदकर हे शाळेची बस धुवत होते. कॉम्प्रेसरला अर्थींग नसल्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या कॉम्प्रेसर व विद्युत जोडणीबाबत योग्य काळजी घेतली नव्हती. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व बेजबाबदारपणामुळे संतोष माळवदकर यांचा वीजेचा धक्का लागून मृत्यु झाला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत