प्रेम विवाहानंतर मुलीला मारहाण नंतर अपहरण; १३ जणांवर गुन्हा दाखल, एकास अटक
शिक्रापूर येथे एका युवकासोबत प्रेमविवाह केल्यानंतर तब्बल एक महिन्याने मुलीच्या नातेवाईकांनी मुलीसह तिच्या सासूला घरात घुसून मारहाण करत मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली. याप्ररकणी १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी आशा काळूबाई लोखंडे (वय ६०, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी बाळासाहेब संपत पुंडे, सरिता बाळासाहेब पुंडे, प्रसाद बाळासाहेब पुंडे (तिघे रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे), कृष्णा बाजीराव नप्ते, रूपाली बाजीराव नप्ते (दोघे रा. करंदी, ता. शिरूर जि. पुणे), अक्षय ओंबळे, लीला ओंबळे, लीला ओंबळेचे पती (नाव माहीत नाही), पमा शांताराम तांबे, शांताराम तांबे (सर्व रा. गणेगाव खालसा, ता. शिरूर, जि. पुणे), प्रशांत सुनील दिघे, बाळूबाई सुनील दिघे (दोघे रा. बुरुंजवाडी, ता. शिरूर, जि. पुणे), सुशीला तळोले (रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रसाद बाळासाहेब पुंडे यास अटक केली आहे.
विजय लोखंडे यांची पत्नी कौटुंबिक वादामुळे अडीच वर्षांपासून माहेरी राहत असल्याने विजय याने प्रियांका पुंडे या युवतीसोबत एका महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला. प्रियांका व तिची सासू घरी असताना अचानकपणे प्रियांकाचे आई, वडील, भाऊ, मामा, मावशी यांसह आदी नातेवाईक चारचाकी व दुचाकी वाहनातून विजय लोखंडे यांच्या घरी आले. त्यांनी घराच्या दरवाजावर लाथा मारून घरात प्रवेश करत प्रियांकासह तिच्या सासूला मारहाण करत आणलेल्या वाहनातून प्रियांकाचे अपहरण करून पळून गेले. पुढील तपास पोलीस करत आहेत.