अन्न व औषध प्रशासनसह पोलिसांची संयुक्त कारवाई ; ६४ लाखांचा गुटखा व १२ लाखांच्या गाड्या जप्त
पुणे: अन्न आणि औषध प्रशासन आणि काळेपडळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ६४ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि १२ लाखांच्या चार पिकअप गाड्या जप्त केल्या.
याप्रकरणी संपतराज पेमाराज चौहान (वय ३८, रा. कोंढवा, पुणे) याला अटक करण्यात आली असून, अन्न सुरक्षा अधिकारी विजयकुमार अंबादास उनवणे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिसांसह वडाचीवाडी रोड, घुले वस्ती, उंड्री येथील एका गोडाऊनवर छापा टाकला. गोडाऊनमधील मालवाहतूक गाड्यांमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या सुगंधित तंबाखू आणि पानमसाला गुटख्याचा साठा आढळून आला. या गोडावूनमधून पोलिसांनी संपतराज पेमाराज चौहान याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडून ६४ लाख ४४ हजार ६५० रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि १२ लाख रुपये किंमतीच्या चार पिकअप गाड्या जप्त करण्यात आल्या.
आरोपी चौहानविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर करत आहेत.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे, यांच्या मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे, पोलीस अमंलदार जाधव, पाटील, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी आणि त्यांच्या पथकाने केली.