पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना आयपीएस हर्षवर्धन यांचा अपघातात मृत्यू
प्रशिक्षण पूर्ण करून पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना कर्नाटकमधील हासन जवळ अपघातात आयपीएस हर्षवर्धन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी किट्टाने गावाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ च्या कर्नाटक केडरचे आयपीएस हर्षवर्धन प्रशिक्षण पूर्ण करून शासकीय वाहनाने पोस्टिंगच्या ठिकाणी जात असताना त्यांच्या गाडीचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले आणि गाडी एका घरावर जाऊन आदळली. या अपघातात हर्षवर्धन यांच्या डोक्याला मार लागला आणि त्यांचा मृत्यू झाला.
हर्षवर्धन हे मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील दोसर गावाचे रहिवासी होते. त्यांचा परिवार बिहारमधील होता. त्यांचे वडील अखिलेश हे सबडिव्हिजनल मजिस्ट्रेट आहेत. हर्षवर्धन यांनी अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली होती आणि २०२२-२३ च्या कर्नाटक कॅडरच्या आयपीएस बॅचचे अधिकारी होते. त्यांनी UPSC परीक्षेत १५३ व्या क्रमांकावर स्थान मिळवले होते आणि पहिल्या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन जिल्हा सशस्त्र दलातील राखीव वाहनाने जात होते. गाडीच्या टायर फुटल्यामुळे ती रस्त्यावरून कलंडली आणि स्थानिक लोकांनी रेस्क्यू करत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून बंगळुरु घेऊन जाण्याची व्यवस्था केली. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.