बोपोडीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने हल्ला; एकाला अटक
पुणे : मागील काही काळापासून शहरात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण अशा गंभीर गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बोपोडीमधील भाऊ पाटील रस्त्यावर घडली आहे. पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले आहे. खडकी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
संदीप सुनील कवाळे (वय २७, रा. डॉ. आंबेडकर चौक, औंध रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. कवाळे याने यासंदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अभिजीत प्रदीप मोरे (वय ३८, रा. चव्हाण वस्ती, बोपोडी) याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप कवाळे आणि अभिजीत मोरे यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावरून शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कवाळे जात होता. त्यावेळी आरोपी मोरे याने कवाळे याला साई मंदिराजवळ अडवले. मोरे याने शिवीगाळ केली. तसेच कवाळे याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत कवाळे गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच पसार झालेल्या मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.