कोलवडी-साष्टे परिसरात अवैध दारू भट्टी उध्वस्त; गुन्हे शाखा युनिट-६ ची कारवाई

पुणे: कोलवडी-साष्टे गावाच्या नदीकिनारी अवैध दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर गुन्हे शाखा युनिट-६ ने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर दारू व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

११ डिसेंबर रोजी युनिट-६ चे पोलीस अधिकारी व अंमलदार अवैध धंद्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी गस्त घालत असताना त्यांना साष्टे गावातील नदीकिनारी एका व्यक्तीने अवैध दारू तयार केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत छापा टाकला. या ठिकाणी ज्ञानेश्वर जब्बू राजपूत (रा. वाडेगाव, ता. हवेली, जि. पुणे) हा इसम दारू तयार करताना आढळला. घटनास्थळावरून पोलिसांनी ७० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू, ८ हजार लिटर कच्चे रसायन आणि इतर साहित्य असा एकूण दोन लाख ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

त्यानंतर, पोलिसांना कल्पना पथरशिंग राजपूत (रा. वाडेगाव, ता. हवेली, जि. पुणे) या महिलेद्वारेही अशाच प्रकारे हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिच्या ठिकाणीही छापा घातला. या कारवाईत ५० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू, चार हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण एक लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ४ लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईने परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

ही कामगिरी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे व सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

rushi