बनाना लिफ कल्याणी नगर येथे हॉटेलमध्ये चोरी करणारा जेरबंद
पुणे – बनाना लिफ, कल्याणी नगर येथील हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला युनिट-४ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सौरभ शिवाजी साबळे (वय २६ वर्षे, रा. वैष्णवी सिटी, देवाची उरुळी, आदर्श नगर, हडपसर, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस हवालदार हरीश मोरे आणि विशाल गाडे हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कल्याणी नगरमध्ये एक व्यक्ती चोरीनंतर दुचाकीवर बसून कोणाची तरी वाट पाहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कल्याणी नगरमध्ये धाव घेतली आणि संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.
आरोपी सौरभ शिवाजी साबळे याच्याकडे येरवडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हा क्रमांक ८२१/२०२४, भारतीय दंड विधान कलम ३०५ आणि ३३४ अन्वये चौकशी केली असता त्याने हॉटेलमधून रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला २ लाख ६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्याला पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि युनिट चारकडील स्टाफने केली.