पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात नऊ जणांनी गमावला जीव

शुक्रवारी (दि. १७) पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे.

देबुबाई दामू टाकळकर (वय ६५, रा. वैशखखेडे, ता. जुन्नर), विनोद केरूभाऊ रोकडे (वय ५०), युवराज महादेव वाव्हळ (वय २३), चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय ५७), गीता बाबुराव गवारे (वय ४५), भाऊ रभाजी बडे (वय ६५, सर्व रा. कांदळी, ता. जुन्नर), नजमा अहमद हनीफ शेख (वय ३५, रा. गडही मैदान, खेड, राजगुरुनगर), वशिफा वशिम इनामदार (वय ०५), मनीषा नानासाहेब पाचरणे (वय ५६, रा. जुन्नर) यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, ऋतुजा पवार (वय २१), गणपत बजाबा घाडगे (वय ५२), शुभम संतोष घाडगे (वय २४, तिघेही रा. कांदळी, ता. जुन्नर), नाजमीन अहमद हनीफ शेख (रा. राजगुरूनगर, ता. खेड), मरजीना महम्मद हमीद शेख (वय १५, ता. राजगुरूनगर, ता. खेड), आयशा समीर शेख (वय १४, राजगुरूनगर, ता. खेड) हे गंभीर जखमी झाले आहेत.

असा झाला अपघात…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळील मुक्ताई ढाब्याजवळ हा अपघात झाला. एक ट्रक आणि एसटी महामंडळाची बस ही दोन्ही वाहने रस्त्याने भरधाव जात होती. यावेळी प्रवासी वाहतूक करणारी एक व्हॅन दोन्ही वाहनांच्या मधोमध घुसली. ट्रकने या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे व्हॅन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. ही गाडी थेट समोरील एसटी महामंडळाच्या बसला जाऊन धडकली.

समोरील बस आणि पाठीमागून आलेल्या ट्रक यांच्यामध्ये सापडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या या वाहनाचा चक्काचूर झाला. अपघात झाला त्यावेळी हे वाहन प्रवाशांनी खचाखच भरलेले होते. या अपघातात एकूण नऊ जण मृत्युमुखी पडले. वाहनाला धडक देऊन ट्रक चालक तिथून पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याला शोधून पकडले.

मृतांपैकी विनोद रोकडे, युवराज वाव्हळ, चंद्रकांत गुंजाळ, गीता गवारे, भाऊ बडे हे जुन्नर तालुक्यातील कांदळी गावचे रहिवासी आहेत. या अपघातामुळे कांदळी गावावर शोककळा पसरली आहे. अपघातस्थळी अत्यंत भयावह असे दृश्य पाहायला मिळत होते.

Leave a Reply

rushi