गावठी हातभट्टी दारू तयार करणारे दोघे गजाआड; वडाची वाडी परिसरात छापा
पुणे: कात्रज-कोंढवा बाह्यवळण रस्त्यावरील वडाची वाडी परिसरात गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. काळेपडळ पोलिसांच्या पथकाने या कारवाईत १२ हजार लिटर कच्चे रसायन आणि चार हजार लिटर तयार गावठी दारू असा एकूण ९ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जगदीश भैरूलाल प्रजापती (वय २४, रा. काळेपडळ) आणि गुलाब संपकाळ रजपूत (वय ३३, रा. होळकरवाडी) अशी आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळेपडळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडाची वाडी परिसरातील ओढ्याजवळ दोन व्यक्ती गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाड टाकली. कारवाईत १२४ कॅनमधील गावठी दारू, १२ हजार लिटर रसायन, दोन मोबाइल संच यासह ९ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक अनिल निंबाळकर व त्यांच्या पथकाने पार पाडली.